Thursday, November 12, 2009

"ती"तली


फुलपाखरं उडताना पाहते
त्यांच बागडणं पाहून स्वत:त हरवून जाते
दिवसा सुस्तावणारी ती बेनाम खोली
रात्री भरणा-या बाजारात
प्रत्येक "पाखराला" पायांनी लाथाडताना रोजच पाहते

फुलांचा सुगंध माडीवर येता
मन बहरून जाते
मोग-याच्या गंधातही शरीराचा वास काढत
येणारा गिराहिक पसंतीचा माल हेरते

तिला कधी नाव नसते
तिचं आयुष्यही निनावीच असते
नाव नसले तरी सर्वासाठी सारखच
एका रात्रीचं ती बि-हाड असते

बाजारबसवी....भटकभवानी
मदनिका कित्येकदा इतरांसाठी होते ती
पण........
हा "पण.."च बदलत असतो
त्यांचे जग त्यांच्यातली "ती"......

एक फुल कुणीतरी देतं...
प्रेमासाठी प्रणयासाठी...
पाकळ्यांसकट प्रत्येक पाकळी उपभोगण्यासाठी,
चार फाटक्या नोटांच्या आशेत स्वत: उपभोगली जाते
घुसमटणा-या मिठीतही घरच्या गरजांचा हिशोब मांडते.

तिचं आयुष्यही असतं ?

मलमलीच्या गालिच्यावरील कोलमडलेली ती
तरीही प्रत्येक रात्र तशीच रंगते,
ती जिवंत स्त्री असली तरी फुलासारखीच कुस्करलीजाते.........
फुलांसारखीच कुस्करली जाते.......

- शशांक नवलकर २८.१०.२००९.

No comments: