Saturday, November 28, 2009

तू जाताना.....


खरच....
खूप काही राहून गेले...
तुझ्या भावनांसवे
माझे अश्रूही वाहून गेले.
खूप काही सांगायचे...
काही बोलायचे....
राहून गेले...
तू जाताना....

ते अश्रू आटले असते का?
त्या आठवणींमध्ये धुके दाटले असते का?
ह्या मनातील प्रत्येक प्रश्न....
....असेच सुटले असते का?
ते प्रश्न, प्रश्नच राहून गेले...
तू जाताना....

आता प्रत्येक वाट अलग.....
तिचा अंतही अलग...
सारे काही मुक्त करून जातेयस.......
परत येशील का? त्याच वाटेकडे
परत.......
सारे काही तेच असेल....
पण काही तरी राहून जाईल........
"तू"....जाताना.........

जरी अंत:करणी गारठलो...
तरी जळत राहीन
त्या आठवणींसवे जगत राहीन......
पापण्याही गारठून ओल्या होतील........
तरीही मी जगत राहीन.......
तुझी वाट पाहत राहीन............

खरच.........
जगणे असेच असेल का ?
तू जाताना............

- शशांक नवलकर २८-११-२००९.

Friday, November 20, 2009

उध्वस्त मी.......................


प्रेमात तुझ्या
हरवूनी अस्तित्व माझे
तुटलो तुकड्यात मी
तुकड्यातुकड्यातूनही रक्त ओथंबले
जाहलो असा उध्वस्त मी

होऊनी निष्पर्ण तुझ्यासवे
त्यागले आज स्वत:ला
त्या प्रत्येक कर्मासाठी
पापासाठी पुण्यासाठी जगण्यासाठी
जाहलो असा उध्वस्त मी

ओठावर तुझ्या हसू पाहतो
जळतो मी
पाहुनी भस्म होत्या स्वप्नांना
त्या सर्वांसवे भस्म होतो मी
आज जळते आहे आयुष्य माझे
जाहलो असा उध्वस्त मी

पाहतो एक पहाट कोवळी
नवे आयुष्य जगण्यासाठी
श्वास घेण्या जातो जिथे
घुसमटतो त्या प्रत्येक क्षणासाठी
होतो अंत माझा होता तुझी सुरुवात
ह्या चक्रव्युहात
जाहलो असा उध्वस्त मी

मागतो मृत्यू तुझ्या देवाकडे
मरण्यासही आतुर जाहलो मी
नाही जेथे मृत्यूही
न काहीच माझे माझ्याकडे
आज जाहलो असा उध्वस्त मी............
उध्वस्त मी.......................

- शशांक नवलकर १९-११-२००९

Friday, November 13, 2009

"मी" विरूद्ध मी....



.
शोध घेता मी स्वत:चा
शोध मनातील वादळांचा
ना असे सावली ना दिसे प्रकाश
दिसे "मी"...
वादळात गुरफटलेला.....

वादळ...
माझ्याच प्रतिबिंबांचे
माझ्याच भावनांचे....
माझ्याच सावलीतले.....
माझ्याच मनातले......
जेथे दिसे फक्त....
"मी"

एक कल्लोळ गजबजलेला...
कोप-या कोप-यातही कर्कश्श...असा
मनी दाटते वर्दळ.....
तुटलेल्या स्वप्नांची....
हरवलेल्या आठवांची
अन... त्यात रूतलेला...........
"मी"

आज पाहता डोकावूनी.......
मनात........
असे फक्त "मी"च....
आणि मीच........

चाले एकच सामना.........
"मी विरूद्ध मी.....

- shashank navalkar 13.11.2009.

Thursday, November 12, 2009

"november rain"


तुला आठवताना
गुलाबी थंडीत चिंब करतो....
तो स्पर्श तो गारवा...ते क्षण
आठवतो असाच थंडावलेला
तो "november rain"

लागते अनामिक ओढ...
त्या पावसाची..त्या गारव्याची
तुला आठवतो भिजताना..
तेव्हा...
आठवतो...हा "november rain"

थरथरल्या ओठांनी स्पर्शिलेस
तेव्हा जाणवला तो स्पर्श...गोठवणारा
जणू गुरफटून जावे त्या गारांसवे
तुझ्या मिठीतच........
तेव्हा.....
हवाहवासा वाटतो "november rain"

चालता धुके तुझ्यासवे
जवळ येतेस तेव्हा....
तु माझीच असतेस.....फक्त माझी
जोडतेस मज काळजाचे तुकडे
होतात एक मने दोन तेव्हा...
होतो अविस्मरणीय असा हा "november rain"

हा पाऊस कधीच परत पडला नाही
अवतरला तो जेव्हा
आठवले क्षण अश्रू गारठवणारे
पुन्हा मला त्याच आठवणींत घेऊन जाणारे
असह्य झाल्या त्या वेदना...
पण हा पाऊस
कधी परत पडलाच नाही..........

- शशांक नवलकर १२.११.२००९.

"ती"तली


फुलपाखरं उडताना पाहते
त्यांच बागडणं पाहून स्वत:त हरवून जाते
दिवसा सुस्तावणारी ती बेनाम खोली
रात्री भरणा-या बाजारात
प्रत्येक "पाखराला" पायांनी लाथाडताना रोजच पाहते

फुलांचा सुगंध माडीवर येता
मन बहरून जाते
मोग-याच्या गंधातही शरीराचा वास काढत
येणारा गिराहिक पसंतीचा माल हेरते

तिला कधी नाव नसते
तिचं आयुष्यही निनावीच असते
नाव नसले तरी सर्वासाठी सारखच
एका रात्रीचं ती बि-हाड असते

बाजारबसवी....भटकभवानी
मदनिका कित्येकदा इतरांसाठी होते ती
पण........
हा "पण.."च बदलत असतो
त्यांचे जग त्यांच्यातली "ती"......

एक फुल कुणीतरी देतं...
प्रेमासाठी प्रणयासाठी...
पाकळ्यांसकट प्रत्येक पाकळी उपभोगण्यासाठी,
चार फाटक्या नोटांच्या आशेत स्वत: उपभोगली जाते
घुसमटणा-या मिठीतही घरच्या गरजांचा हिशोब मांडते.

तिचं आयुष्यही असतं ?

मलमलीच्या गालिच्यावरील कोलमडलेली ती
तरीही प्रत्येक रात्र तशीच रंगते,
ती जिवंत स्त्री असली तरी फुलासारखीच कुस्करलीजाते.........
फुलांसारखीच कुस्करली जाते.......

- शशांक नवलकर २८.१०.२००९.

october rain


थंड वा-यात
गुलाबी उन्हात
मंद गंध मातीचा
दरवळतो...

चिंब भिजता
ओल्या आठवांनी
घेता निरोप पावसाचा
पुन्हा अवतरला
तो

प्रेमाचा रंग बहरला
गुलाबी ओठांवरती
थेंब पडूनी मोह आवरला
तिच्या नयनांवरती
तो बरसतो

भिजण्याची मजा
पुन्हा हवी-हवीशी वाटे
पावसातही पावसानंतरही
जेव्हा पुन्हा असा पाऊस....
अवतरतो............

गुलाबी थंडीतही
चिंब ओलावा
पुन्हा सुखावतो..
असा हा "october rain"
मनी माझ्या
बरसतो.

- शशांक नवलकर १०/१०/२००९.